Ladki Bahin Yojana: 1500 नव्हे, तर 2100 रुपये; लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

ही माहिती मैत्रिणींसोबत शेअर करून मदत करा

कोल्हापूर | प्रतिनिधी राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी आणि निर्णायक घोषणा केली आहे. सध्या दरमहा 1500 रुपये मिळणारा हप्ता लवकरच 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी महिलांना आर्थिक बळ देण्याचा सरकारचा निर्धार पुन्हा एकदा ठामपणे मांडला.

ladki-bahin-yojana-2100-rupees-eknath-shinde-announcement-ezgif.com-jpg-to-webp-converter
ladki-bahin-yojana-2100-rupees-eknath-shinde-announcement-ezgif.com-jpg-to-webp-converter

सभेत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “एकनाथ शिंदे हा शब्दाचा पक्का आहे. माझ्या लाडक्या बहिणींना केवळ आर्थिक मदत देऊन मी थांबणार नाही, तर त्यांना लखपती केल्याशिवाय शांत बसणार नाही.” त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून सरकारचा हेतू केवळ मासिक मदत देण्यापुरता मर्यादित नसून, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेलाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले. “ज्या उमेदवाराच्या मागे महिला शक्ती ठामपणे उभी असते, त्याचा विजय निश्चित असतो. दर महिन्याला ओवाळणी देणारा हा तुमचा भाऊ आज केवळ मते मागण्यासाठी आलेला नाही, तर तुमचा सन्मान आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी इथे उभा आहे,” असे ते म्हणाले. लवकरच या योजनेतील आर्थिक मदत वाढवून 2100 रुपये केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित करताना शिंदे म्हणाले की, या निवडणुका कोणत्याही पक्षाचा खरा पाया मजबूत करणाऱ्या असतात. “मी आज नेहमीसारखं भाषण करणार नाही. केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या पाठबळासाठी प्रचाराला आलो आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक राजकारणावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार आणि एक खासदार असून, पक्षाची संघटनात्मक ताकद वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार संजय मंडलिक यांचा उल्लेख करताना ते म्हणाले, “मागच्या वेळी ते थोडक्यात सुटले, पण पुढच्या वेळी नक्की बरोबर पकडतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लाडकी बहीण योजनेतील हप्ता वाढवण्याच्या घोषणेमुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार असून, आगामी काळात या योजनेची अंमलबजावणी कशी आणि कधी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा.. “मुख्यमंत्र्यांच्या ‘पिंक ई-रिक्षा योजने’चा नागपूरमध्ये शुभारंभ; 10,000 महिलांना मिळणार स्वतःची इलेक्ट्रिक रिक्षा!”